पुस्तक: Why don’t you fly? -Backdoor to Beijing by Bicycle
लेखक: क्रिस्तोफर स्मिथ
पाने: २७४
माझ्यामते प्रवासवर्णन लिहिणे ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. कारण प्रवास जेवढा रोमहर्षक असतो त्या तोडीचे लिखाण घडत नाही जे तिर्हाईताला वाचावेसे वाटेल, गुंतवून ठेवेल. आणि त्यात परत सायकल प्रवासवर्णन असेल तर आणखीनच अवघड कारण लहानपणी जे सायकलशी नाते तुटलेले असते ते आयुष्यभर तसेच राहते. आणि म्हणूनच इंग्लंड ते चायना या सायकल प्रवासाचे वर्णन करणारे हे पुस्तक मला फार आवडले. (तसे मीही डोंबिवली ते कोकणात हर्णे आणि परत असे ५०० कि. सायकलिंग केले आहे)
पुस्तक आवडले कारण क्रिसोफरने प्रवासाचा खिस न काढता अतिशय ओघवत्या रीतीने लिहिले आहे. जसा त्याचा प्रवास पुढे सरकत जातो तसेच पुस्तकही आपसूक पुढे पुढे सरकत जाते, मध्ये कोठे अडकत नाही, अडखळत नाही. कंटाळवाणेही होत नाही. इंग्लंड मधून सुरु करून त्याने युरोप पार केले, मग इराण मध्ये शिरला, तेथील वाळवंट आणि कठोर परिसर पार करत अफगाणिस्तानच्या डोंगर दऱ्यातून पाकिस्तानमध्ये गेला. तेथे दहशतीने ग्रासलेल्या बलुचिस्तान प्रांतातून तो हिंदुस्तानात आला, आणि अमृतसर ते कन्याकुमारी आणि परत कलकत्ता वरून अमृतसर असे हिंदुस्थान भ्रमण करून तो वागाह बॉर्डर वरून परत पाकिस्तान मार्गे चायना मध्ये दोन पाय आणि दोन चाके घेऊन गेला.
शेवटी रशिया मधल्या सायबेरिया येथे जायची इच्छा असूनही रशियाने व्हिसा न दिल्याकारणाने त्याला आपला प्रवास बीजिंग मध्ये संपवावा लागला. पण हा हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास मनोरंजक किस्स्यांनी, विविध देशातील चालीरीत्यांनी, असंख्य अनुभवांनी आणि ६-७ वेळा सायकलवरून पडून अविस्मरणीय बनला आहे.
काही देशांमध्ये त्याने अनुभवलेले ठळक मुद्दे:
जर्मनी- अतिशय काटेकोरपणे नियम पाळणारे लोक. सायकलसाठी अतिशय कमी रस्ते आणि चुकून गाड्यांच्या रस्त्यावर सायकल गेली तर ताबडतोब दंड.
इराण- उत्तम रस्ते पण अत्यंत रखरखीत प्रदेश. तिथे बायका म्हणजे काळे कापड एवढेच. पण सामान्य पुरुष अत्यंत चांगले व मदत करणारे.
अफगाणिस्तान- बायका कुठे दिसतच नाहीत. जिकडे तिकडे पुरुष आणि उंच उंच डोंगर.
पाकिस्तान- गरीब प्रदेश, पण लोक मदत करणारे. बलुचिस्तान हा अत्यंत धोकादायक प्रदेश पण डोंगरांनी नटलेला.
हिंदुस्थान- प्रचंड आकार असलेला देश. रस्त्यावर शिस्त नावाचा प्रकारच गायब. पण जेवढे प्रेम, आपुलकी, सुंदर स्रीया आणि सुरक्षा हिंदुस्तानमध्ये आहे ती इतर कोणत्या देशात अनुभवली नाही.
चीन- अपेक्षापेक्षा एकदम निराळा, सरळ सपाट माणसांनी भरलेला प्रदेश नसून हिरव्यागार डोंगरांनी भरलेला देश. स्रीया वागायला एकदम मोकळ्या. लोक चांगले पण राजकारणी वाईट.
अशा अनेक देशातून आपल्याला हे पुस्तक किलोमीटर किलोमीटरने घेऊन जाते आणि शेवटी परत युरोप मधल्या एकसंध, कंटाळवाण्या जीवनात नेऊन सोडते. हे पुस्तक आकाराने मोठे आहे, त्यातील अक्षरे तुलनेने छोटी आहेत, म्हणजेच २७४ पाने असली तरी ३५० पानांऐवढा मजकूर सहज असणार. पण सुरुवात केली की शेवटपर्यंत वाचावेसे वाटणारे पुस्तके आहे यात शंकाच नाही.
क्रिस्तोफरच्या सायकल सफारीचे फोटो येथे पाहू शकता:
www.cycleuktochina.com
क्रिस्तोफरच्या सायकल सफारीचे फोटो येथे पाहू शकता:
www.cycleuktochina.com
धवल रामतीर्थकर
(सीवूड्स, नवी मुंबई)
आणि आता पुढचे वाचन सुरू... गाणाऱ्याचे पोर



टिप्पण्या