द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र
आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं.
द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो.
त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इतिहासाच्या कालखंडांची उत्तम मांडणी किती महत्वाची असते हे आता कळते. परिणामस्वरूप धडाधड पाने उलटत गेलो, गाळत गेलो आणि पुस्तक संपवले आणि गडबडीने पुस्तक बदलूनही आलो.
नवीन पुस्तकही इतिहासावर आहे, पण आधुनिक इतिहास ज्याने जगाचा नकाशाच बदलून टाकला आहे...९/११.
लवकरच...
धवल रामतीर्थकर
सीवुडस, नवी मुंबई

टिप्पण्या