मुख्य सामग्रीवर वगळा

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक: शिवछत्रपतींचे आरमार
लेखक: गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे
पाने: १७७ 

आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक.

A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0

१५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तर एवढी कठीण परिस्थिती होती की जहाज बांधायला कारागीर मिळेनात. पोर्तुगीज कारागीर ठेवले तर ख्रिश्चन धर्माची शपथ घालून त्यांना पोर्तुगीजांनी परत बोलावून घेतले. ना ना प्रकारे शिवाजी महाराज आरमार बांधू नयेत असे प्रयत्न केले. पण किनाऱ्यापासून ४० मैल आत का होईना पण जहाज बांधणीचे काम नेटाने चालू ठेवले आणि बघता बघता पोर्तुगीज आणि ब्रिटिश या दोन समुद्री महासत्तांनी झुगारून शिवाजी महाराजांचे छोटेखाना आरमार समुद्रात उतरले.
 

लक्षात असू देत की हे करतानाच दुसऱ्या बाजूला जमिनीवर बलाढ्य मुघल सत्तेशी सतत संघर्ष चालू होताच. समुद्रातील खरा रोमहर्ष आणि संघर्ष तर आता सुरु होतो. खाली कोकणात जंजिरा हे हबशींच्या ताब्यात, गोवा मध्ये पोर्तुगीज, आणि मुंबईत इंग्रज. यांच्या मध्ये शिवाजी महाराजांचे छोट्या बोटी, गलबते यांचे आरमार आकार घेऊ लागले. मोठ्या बोटी बांधण्याचे कौशल्य तेव्हा आपल्याकडे नव्हते. जंजिऱ्याचा सिद्दी दर वर्षी मुंबईत आपली लढाऊ जहाजे घेऊन आश्रय घ्यायचा आणि तेथून स्वराज्यातील किनाऱ्यावरील गावांवर हल्ले करून नासधूस करत, जाळपोळ करत आणि हिंदू लोकांना गुलाम म्हणून घेऊन जात. मुंबईजवळ असलेल्या दोन छोट्या बेटांवर (खांदेरी-उंदेरी) पहिल्यांदा किल्ला बांधण्याची शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला पण ब्रिटिश दबावामुळे सोडून द्यावा लागला.
 

पण या किल्ल्यांचे महत्व जाणून दहा वर्षांनी परत प्रयत्न केला आणि अशी लढत रंगली की तोंडात बोटे घालून वाचत राहा आणि कल्पना करत राहा. छोटी पण चपळ स्वराज्याची लहानशी गलबते आणि गुराबे V/S अजस्त्र, १०० तोफांनी सज्ज ब्रिटिश फ्रिगेट जहाजे यांच्यातली उंदीर-मांजराची पकडापकडी दररोज चाले. पण त्यांच्या २४ X नाकेबंदीमधून निसटून गलबते किल्ल्यांवर माल, शिसे, चुना याचा पुरवठा चालू ठेवला आणि ब्रिटिशांच्या आरमाराला चकवून हळू हळू किल्ला बांधून पूर्ण केला.  त्यात परत सिद्दी पण ब्रिटिशांना सामील झाला, पण शेवटी सरशी मराठयांचीच झाली. याचे श्रेय जेवढे मायनाक भंडारी (जो खांदेरी बेटावर पहिल्यांदा उतरला आणि बांधकाम सुरु केले) याला आहे तेवढेच शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला आणि व्यूहरचनेचे ही आहे. त्याशिवाय हे शक्य झालंच नसतं.

जवळजवळ अर्धे पुस्तक फक्त खांदेरी उंदेरी कसा बांधला यावर आहे. आणि हेच या पुस्तकाचे वैशिष्ट आहे. आणि गजानन मेहंदळे म्हटलं की प्रत्येक पानावर पुरावे आले, ऐतिहासिक पत्रे आली आणि पक्की हकीकत आली. फक्त जर त्या काळच्या बोटींचे फोटो दिले असते तर डोळ्यांसमोर आणखी स्पष्ट चित्र उभं व्हायला नक्कीच मदत झाली असती.
 

जशी स्वराज्याची सुरुवात चहूबाजूंनी शत्रूने वेढलेल्या अत्यंत कठीण काळात एका छोट्या पण महत्त्वपूर्ण मोहिमेने झाली, तशीच मराठी आरमाराची सुरुवातही छोट्या पावलांनी, शत्रूने पूर्णपणे वेढलेल्या अशा असामान्य परिस्थितीशी झुंझूनच झाली असे लक्षात येते.
 

आणि काय बोलावे, स्वतः वाचावे आणि त्यात बुडून जावे
 

धवल रामतीर्थकर
नवी मुंबई





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...