मुख्य सामग्रीवर वगळा

पडघवली

 'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज

- आज बाई सारवा, उद्या बाई तारवा
- इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही
- माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी
- फाशांचा डाव नि दैवाचा घाव
- पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या...
- भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई
- पोरीत पोरगा लोंबडा...
- फट म्हणता सन्याशी मरायचा!
- नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ
- आपलं घर नि शेणाने भर
कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे.


पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून काय पाहिजे असे किल्लेदार विचारतो तेव्हा केशवभट म्हणतात, 'जागा द्या बसायला, नांदायला. फार काय करायची? घोंगडीएवढी द्या.' आणि मग बघा गम्मत केशवभटांच्या हुशारीची.
केशवभटांनी जमिनीत खुंटी ठोकली, तिला घोंगडीच्या सुताचे टोक बांधलं आणि एका हातात घोंगडीच्या सुताचा गुंडा आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन निघाले केशवभट माजलेल्या रानात. चार घटकांनी केशवभट खाडीच्या अंगाने हजर. अंगावर रक्ताचा शिंपडा, तरवार रक्तानं न्हायलेली. सुताचे दुसरे टोक त्यांनी येऊन खुंटीत अडकवलं. "धनी, ही एवढी घोंगडभर जमीन!" आणि किल्लेदार अंगावरच्या रक्ताबद्दल विचारतात तेव्हा कशवभट म्हणतात, 'जंगलाच्या राजाचं (वाघ). तुम्ही जागा दिलीत. पण त्यानं कुठं दिली? भांडावं लागलं त्याच्याशी. दोन घाव दिले, दोन घेतले."
तर असा जन्म होतो पडघवली गावाचा. आणि तिथून पुढे सुरु होते एका कोकणातल्या गावातील महाभारत. सुरुवातीला रसरशीत कोकणात आपण प्रत्येक दिवस आणि सण आनंदात साजरा करतो. हळू हळू गाव वाढू लागते, लोक जमू लागतात आणि एका सडक्या आंब्याने अक्खी पेटी नासवावी अगदी तसे काही वाईट प्रवृत्तीचे लोक पडघवली नासवतात. पण या पूर्ण प्रवासात आपण पडघवलीतच असतो. कधी केशवभटांबरोबर, कधी अंबे बरोबर, तर कधी धिप्पाड गनांभावजी, दुर्गावंस, बनी, आतेसासूबाई, मामंजी आणि नासक्या व्यंकू आणि अशा असंख्य पडघवलीकरांबरोबर.
काही वर्षांपूर्वी मी विश्वास पाटील यांचे 'पांगिरा' पुस्तक वाचले होते. ती आहे देशावरच्या खेड्याची गोष्ट, कसं उसाच्या नादाने सुजलाम सुफलाम गावांची कळा घालवली. 'पडघवली' आणि 'पांगिरा', एकच सत्य आपल्यासमोर ठेवते. एक कोकणातल्या टुमदार खेड्याची करुण कहाणी आणि दुसरे देशावरच्या धष्टपुष्ट गावाची दुःखद गोष्ट.
पुढच्यावेळी कोकणात गेला की पडघवलीला नक्की भेट द्या. तिथे मोकळ्या, मोडकळीस आलेल्या घरांमध्ये सगळे पडघवलीकर नक्की भेटतील.
धवल रामतीर्थकर
सीवूड्स, नवी मुंबई




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...