पुस्तक: आतंक (कथा संग्रह)
लेखक: विलास सारंग
पाने:२२५
मराठी लेखन कारण्यामधली मोठी समस्या म्हणजे मध्यमवर्गीय, 'घरगुती' संस्कृतीच्या प्रभावापासून आपला आत्मा वाचविण्याची. आधुनिकतावादी वृत्तीने जीवनाचा वेध घेऊ पाहणाऱ्या लेखकाला मध्यमवर्गीय संवेदनांवृत्तीपासून ('सेन्सिबिलिटी' पासून) स्वतःचा बचाव करणे भाग पडते. कौटुंबिकता, 'सात्विकता', स्थिरता अशा मूल्यांना चिकटून राहणारी, मर्यादित परिघात सुरक्षित राहू पाहणारी, वेगळ्या नव्या विचारांकडे, मूल्यांच्या शोधाकडे संशयाने पाहणारी मध्यमवर्गीय संवेदनावृत्ती खऱ्या कलात्मक गांभीर्याला पोषक नसते. खेळकर घरगुतीपणा हा मराठी भाषाशैलीचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे.
हे आहे विलास सारंग यांचे मत आणि त्यांच्या लिखाणामागचा विचार जो त्यांनी पुस्तकाच्या शेवटी मांडला आहे.
विलास सारंग यांच्या या कथासंग्रहतील प्रत्येक कथा याच विचारसरणीतून साकारली गेली आहे. 'सुखकर्ता सुखकर्ता' मधील विसर्जन मिरवणुकीत अचानक आसनावरून उठून पळून जाणारे गणपती, 'मरणवृक्ष' मधील बुवांच्या चित्रामधून धूप जळत राहणे आणि त्याने अख्खे शहर धुपीच्या थरांखाली गाडलेले राहणे, 'कुर्मा -पुलाव' मधील खोल दलदल ज्यात पाय ठेवताच त्यात बुडून जाणे किंवा 'गर्भवती' मध्ये एका शिल्पकाराला मनासारखे गर्भवतीचे शिल्प साकारता न आल्यामुळे तो दरवाजा दुरुस्तीचे काम हाती घेतो आणि रात्री तोच दरवाजा चालत येऊन त्याच्या गर्भवती पत्नीचा जीव घेतो!
कोणतीही कथा सरळ, एका रेषेत कधीच पुढे सरकत नाही. गम्मत अशी की एक कथा वाचताना यात काहीच होत नाही आहे असे वाटत असतानाच अचानक कथा असे काही वळण घेते की त्याची आपण कल्पनाही केली नसेल. अजून एक वैशिष्ट्य असे की कोणत्याही कथेला एक निश्चित शेवट नाही. ती अधांतरी संपते. पुढे काय होणार त्याचे चित्र वाचकाने आपापल्या कल्पनांच्या कुवतेप्रमाणे रंगवायचे, किंवा तिथेच सोडून द्यायचे.
एका वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे असे निश्चित म्हणू शकतो. यातील कथांमध्ये रहस्य आहे, गूढता आहे, वासना आहे पण बीभत्सपणा नाही, आणि न चुकता प्रत्येक गोष्टीत एक अनपेक्षित वळण आहे, किंवा विषयच अनपेक्षित आहे. मला विलास सारंग हे लेखक परवापर्यंत माहीत नव्हतं. पण त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर यातल्या कथा दीर्घ काळ लक्षात राहीतील हे नक्की!
धवल रामतीर्थकर
नवी मुंबई
.jpeg)
टिप्पण्या