पुस्तक: गाणाऱ्याचे पोर लेखक: राघवेंद्र भीमसेन जोशी पाने: १८७
पंडित भीमसेन जोशींचे स्वर्गीय स्वर ज्याने कधी ऐकले असतील तर ते विसरणे केवळ अशक्य! अशा व्यक्तीच्या मुलानेच जर आपल्या वडिलांबद्दल पुस्तक लिहिले तर जवळच्या व्यक्तीला ज्या गोष्टी, जे कंगोरे जे क्षण माहिती असतील ते इतर कोणाला कळणे शक्य नाही. म्हणूनच मला पुस्तक आवर्जून वाचावेसे वाटले. वाटले की भीमसेन जोशींच्या सवयी, आवड- निवड,रियाज, गाण्यामागचे रहस्य, शिकण्याचा काळ वगैरे वगैरे गोष्टी कळतील.
पण पुस्तक वाचायला लागलो आणि एक गोष्ट लक्षात यायला लागली की हे पुस्तक पंडित भीमसेन जोशींबद्दल मुळात नाहीच आहे. त्यांच्या मुलाने आपले गऱ्हाणे, आपली दुःखे, आपल्यावर झालेला अन्याय या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. पंडित भीमसेन जोशी हे कलाकार म्हणून अतुलनीय असतील पण स्वतः च्या आयुष्यात त्यांनी चुका केल्या व त्यांचा पाढा म्हणजे हे पुस्तकं आहे.
वास्तविक राघवेंद्र जोशी हे एक नावाजलेले 'पानाड्या' होते, म्हणजे जमिनीत पाणी कोठे लागेल हे ते अचूकपणे सांगत. संरक्षण विभागातले सुरक्षित नोकरी सोडून पूर्णवेळ वैराण, प्रसंगी खडकाळ पाणी शोधून देऊन बोरवेल खणून द्यायचा उद्योग सुरु केला याला धाडस लागते व वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. पण हे सांगताना सुद्धा त्यात कसे वडिलांनी सतत अपमान केला आणि अन्याय केला हेच मनात ठेवून सांगितले तर चांगली गोष्ट ही दडपली जाते.
पुस्तकाची एकूण रचना अशी आहे. पंडित भीमसेन जोशींबद्दल एक आठवण आणि ते किती चांगले होते, निरागस होते आणि कसे त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या मुठीत असल्याकारणाने असहाय्य होते हे एक वाक्य किंवा परिच्छेद, आणि लगेच त्यापुढे पहिल्या बायकोवर आणि मुलांवर किती व कसा अन्याय केला याबद्दल आहे. आणि हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्णवेळ असेच चालू राहते.
कबूल आहे की लग्नाच्या बायकोला निराधार सोडून दुसऱ्या बाईच्यामागे जाणे हे चूक आहे. पण हा अन्याय कसा मांडायचा याचेही एक तंत्र असते. जर सतत रडताच राहिलं तर त्याची प्रखरता कमी होते व दुसऱ्यांना त्याचा उबग येतो. तसेच काही हे पुस्तक वाचून वाटते. ना पंडित जोशींच्या महान कलेबद्दल मन बहरून जाते, ना पहिल्या बायकोवर आणि मुलांवर केलेल्या अन्यायामुळे मनात चीड उत्पन्न होते किंवा मन द्रवून जाते. या सततच्या चांगले-वाईट, चांगले-वाईट प्रकारामुळे शेवटची काही पाने मी अक्षरशः गाळत गेलो आणि पुस्तक एकदाचे संपवले.
धवल रामतीर्थकर
सीवूड्स, नवी मुंबई


टिप्पण्या